अजित पवार गटात खळबळ – धनंजय मुंडेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा!

अजित पवार गटात खळबळ – धनंजय मुंडेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा!

वाशीम: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात मोठे राजकीय नाट्य घडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. यामुळे पक्षात मोठी खळबळ माजली होती. मात्र, त्यानंतर अजित पवार गटाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

हसन मुश्रीफ यांचा तडकाफडकी राजीनामा – नेमकं कारण काय?
हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. राज्य सरकारने पालकमंत्री पदांचे वाटप करताना त्यांना कोल्हापूरऐवजी तब्बल 600 किलोमीटर दूर असलेल्या वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले होते. त्यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची त्यांची अपेक्षा होती, मात्र तसे न झाल्याने त्यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली होती.

वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांना वारंवार कोल्हापूर-वाशिम असा लांबचा प्रवास करावा लागत होता, यामुळे ते अस्वस्थ होते. अखेर त्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांनी अजूनही राज्य मंत्रिमंडळातील अन्य जबाबदाऱ्या सांभाळण्याबाबत कोणतेही विधान केलेले नाही.

अजित पवार गटाला मोठा धक्का?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर हसन मुश्रीफ यांनी देखील पदाचा राजीनामा दिल्याने अजित पवार गटातील अस्थिरता वाढली आहे. दोन बड्या नेत्यांच्या राजीनाम्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अंतर्गत असंतोष वाढत चालल्याचे संकेत मिळत आहेत.

या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. आता हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय नेत्यांच्या आगामी भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.